पुणे : पत्नीकडे वाईट हेतूने पाहणार्‍या चुलत मेव्हण्याचा खून; 48 तासांत पोलिसांनी लावला छडा | पुढारी

पुणे : पत्नीकडे वाईट हेतूने पाहणार्‍या चुलत मेव्हण्याचा खून; 48 तासांत पोलिसांनी लावला छडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पत्नीकडे वाईट हेतूने पाहणार्‍या चुलत मेव्हण्याचा खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली. अठ्ठेचाळीस तासांच्या आत पोलिसानी अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावला, अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
तुषार दिलीप मेटकरी (वय 33, रा. केशवनगर), विनोद विष्णू दुपारगुडे (वय 34, रा. वडगाव धायरी,) किरण अंकुश चौधरी (वय 43, रा. नांदेड फाटा), आशा तुषार मेटकरी (वय 32, रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, महादेव गणपती दुपारगुडे असे खून केलेल्याचे नाव आहे.

दहीहंडीच्या दिवशी जांभूळवाडी परिसरातील दरीपुलाच्या खाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके काम करीत होती. व्हॉट्स्अ‍ॅपद्वारे त्याचा फोटो प्रसारित केल्यानंतर विजय दुपारगुडे यांनी पोलिस ठाणे गाठून खून झालेली व्यक्ती महादेव त्याचा भाऊ असल्याचे सांगितले. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, रवींद्र चिप्पा, तुळशीराम टेंभुर्णे, हर्षल शिंदे यांनी संशयित म्हणून तुषार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याच्या मोबाईलमधून महादेव दुपारगुडे याच्या मोबाईलवर त्या दिवशी झालेले त्याचे कॉल त्याला दाखवून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.

…म्हणून काढला काटा
खून झालेली व्यक्ती महादेव आणि खून करणारे आरोपी हे एकमेकांच्या नात्यातील आहेत. महादेव हा तुषार याचा नात्याने चुलत मेव्हणा आहे. मात्र, तरीदेखील तो तुषार याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता. यापूर्वी त्याला अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. परंतु तरीदेखील तो त्याचे वागणे काही बदलत नव्हता. 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या दिवशी त्याला तुषारने पत्नीच्या आईच्या घरी वडगाव धायरी येथे बोलावून घेतले. तेथे त्याला परत सर्वांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीसुद्धा तो ऐकत नव्हता. त्या वेळी रागात तुषार, त्याची पत्नी व इतर साथीदारांनी मारहाण केली. महादेव बेशुद्ध पडल्याचे पाहिल्यानंतर रिक्षाने जांभूळवाडी येथील दरीपुलाखाली टाकून निघून गेले. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला होता.

घटनास्थळावर कोणताही पुरावा नसताना, पोलिसांनी 48 तासांत तांत्रिक विश्लेषणाद्वारे अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावून चौघांना अटक केली आहे. पत्नीकडे वाईट हेतूने पाहून त्रास देत असल्याच्या कारणातून खून केल्याचे समोर आले आहे.

                             जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ

Back to top button