पुणे : एस.टी.ला मिळाले 9 कोटींचे उत्पन्न; सलग सुट्यांचा परिणाम | पुढारी

पुणे : एस.टी.ला मिळाले 9 कोटींचे उत्पन्न; सलग सुट्यांचा परिणाम

पुणे : मागच्या आठवड्यात आलेल्या सलग सुट्यांच्या काळात एसटीच्या पुणे विभागाला 9 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याच काळात सर्वाधिक उत्पन्न मिळविण्यात एसटीचा पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. पुणे शहरात नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अनेक नागरिक बाहेरगावावरून आले आहेत. सणासुदीच्या सुटीच्या काळात बाहेरगावाहून आलेले नागरिक आवर्जून एसटीने गावी जातात. अशातच मागील आठवड्यात शनिवार, रविवार, त्यानंतर 15 ऑगस्ट, रक्षाबंधन आणि पारशी नूतन वर्ष, अशा सलग पाच सुट्या आल्यामुळे अनेकांनी आपले गाव गाठले. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाला राज्यात सर्वाधिक 9 कोटी उत्पन्न मिळाले.

…असे वाढतेय उत्पन्न
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टपासून एसटीने नियोजन केले होते. त्यानुसार या दिवशी पुणे एसटी विभागाची गाडी दोन लाख 57 हजार किलोमीटर धावली. त्यामध्ये एसटीला 1 कोटी 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दररोज प्रवासी संख्या वाढत गेली. अखेरच्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी पुणे विभागाची एसटी 2 लाख 88 हजार किलोमीटर धावली. त्यामधून एसटीला 1 कोटी 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण सात दिवसांमध्ये एसटी 18 लाख किलोमीटर धावली. त्यामधून एसटीला तब्बल 8 कोटी 95 लाख 34 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

एसटीच्या पुणे विभागातील डेपो
13

एसटीच्या पुणे विभागातील बस
729

पुणे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्न, किलोमीटर, प्रतिकिलोमीटर उत्पन्न अशा सर्वच बाबतीत राज्यात पहिला क्रमांक मिळविला. गेल्या सात दिवसांमध्ये सर्वांनी एसटी महामंडळ प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे प्रवाशांचे व एसटीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार.

                                 – रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग

Back to top button