आपटीत नातवानेच केला आजोबांचा खून; दारूला पैसे न दिल्याने 20 वर्षांच्या युवकाचे कृत्य | पुढारी

आपटीत नातवानेच केला आजोबांचा खून; दारूला पैसे न दिल्याने 20 वर्षांच्या युवकाचे कृत्य

भोर; पुढारी वृत्तसेवा: आजोबांनी नातवास दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्यांच्याच घरासमोर नातवाने त्यांना लाकडी बॅटने मारून खून केल्याची घटना आपटी (ता. भोर) येथे शनिवारी रात्री घडली. नथू कोंडीबा पारठे (वय 70) असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रथमेश आनंदा पारठे (वय 20) या नातवास रविवारी (दि. 21) भोर पोलिसांनी सापळा रचून भोर एस. टी. स्थानकावरून अटक केली.

नथू यांचे भाऊ दत्तू यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत नथू पारठे यांच्याकडे नातू प्रथमेशने दारू पिण्यास पैसे मागितले असता आजोबाने पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्याच घरासमोर लाकडी बॅटने आजोबांना मारहाण करून त्यांचा खून केला आहे. दत्तू यांनाही ‘तुम्ही इथे थांबायचे नाही’, असा दम देऊन आरोपी नातू फरार झाला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

Back to top button