चाकण : भांडण सोडविणार्‍या मध्यस्थावर हल्ला | पुढारी

चाकण : भांडण सोडविणार्‍या मध्यस्थावर हल्ला

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका गावात सासरा- जावयाचे भांडण सोडविणे एकाला चांगलेच महागात पडले. भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या मध्यस्थालाच लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार भांबोली (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता घडला. याप्रकरणी ओमजित बाबाजी पडवळ (वय 20, रा. खेड) यांनी महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषी जगताप (पूर्ण नाव माहिती नाही) , बबन जगताप व नितीन जगताप यांच्यावर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र तेजेश लिंभोरे याच्यासह आल्फा टेक इंजिनिअरिंग कंपनीजवळ दुचाकीवरून गेले. तिथे लिंभोरे यांच्या ओळखीचा सुरक्षा रक्षक कांबळे व त्यांचा जावई यांच्यात मुलीच्या नांदण्यावरून भांडणे सुरू होती. या वेळी फिर्यादी त्यांना समजवून सांगण्यास गेले असता ऋषी जगताप व इतर आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. ऋषी याने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

Back to top button