पुणे : लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्यांवर पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल | पुढारी

पुणे : लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्यांवर पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील जुनैदसह त्याच्या चार साथीदारांवर शनिवारी पुणे येथील न्यायालयात दोन हजार पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दापोडी परिसरातून जुनैदला एटीएसने अटक केली होती. जुनैद व त्याचे सहकारी दिल्ली व उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखत असल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात असलेल्या उमर या मास्टर माइंडच्या मार्गदर्शनाखाली हल्ल्याची योजना ते आखत होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या कालावधीत लॉकडाऊन लागल्याने त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. दहशतवादविरोधी पथकाने जुनैदसह त्याच्या 4 साथीदारांवर शनिवारी न्यायालयात दोन हजार पानी दोषारोप पत्र दाखल केले.

जुनैदला येत होते टेरर फंडिंग
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला एटीएसने यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर जुनैद याचे साथीदार इनामूल हक, युसूफ आणि आफताब हुसैने शाह अशा चौघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला टेरर फंडिंग करण्यात आल्याचे गुप्तचर विभागाच्या तपासात समोर आले होते. त्यांनी याची माहिती एटीएसला दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. युसूफ व आफताब शाह यांना काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. इनामूल हक याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक केली होती.

पुण्यात दीड वर्षापासून होते वास्तव्य

10वी नापास असलेला जुनैद सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असून, गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे काम करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचे या तपासातून निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात असलेल्या मास्टर माइंड उमर याच्या इशार्‍यावर ते काम करत असल्याचे तपासात आढळून आल्याचे एटीएसच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

  • मास्टरमाइंड उमर पाकिस्तानात
  • दिल्ली, उत्तर प्रदेशात हल्ल्याचा जुनैदचा होता प्लॅन
  • दापोडी परिसरातून जुनैदला एटीएसने ठोकल्या होत्या बेड्या

Back to top button