नर्‍हे, धायरीत रस्त्यांची चाळण

धायरी; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोड परिसरातील नर्‍हेगाव व धायरी परिसरातील रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे. परिसरातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण नर्‍हेगाव व धायरी परिसराला खड्ड्यांचा विळखा पडल्याचे चित्र आहे.
भूमकर चौक, झील कॉलेज, श्री कंट्रोल चौक, पारी कंपनी चौक तसेच श्री कंट्रोल चौकाकडून औद्योगिक वसाहतीतून धायरी बाजूकडे जाणारा रस्ता, रायकर मळा, जाधवनगर, अंबाई दरा आदी ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

या रस्त्याने ये-जा करताना वाहनचालकांसह नागरिक, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात रस्त्यावर खड्डे पडले आहेत की संपूर्ण परिसर खड्ड्यात गेला आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. ‘खड्डे असलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविल्याने वाहनचालक व ज्येष्ठांना मणक्याच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्त्यांची पहिल्यांदाच इतकी बिकट अवस्था झाली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांबाबत संबंधित अधिकार्‍यांना कळवूनदेखील महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. पालिका प्रशासनाने त्वरित रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाप्पू पोकळे यांनी दिला.

रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून ते बुजविण्याचे काम सुरू आहे. डांबर प्लान्ट सुरू झाल्यानंतर येथील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात येईल.

                                – श्रीकांत फडतरे, कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिका.

Exit mobile version