आत्महत्येचा विचार करणाऱ्या डॉक्टर महिलेला लष्कर पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवदान, नैराश्यातून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न | पुढारी

आत्महत्येचा विचार करणाऱ्या डॉक्टर महिलेला लष्कर पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवदान, नैराश्यातून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रूग्णांवर योग्य ते उपचार करून त्यांना बरे करणार्‍या डॉक्टरांना आपल्याकडे देवाची उपमा दिली जाते. परंतु डॉक्टरालाच दुर्धर आजाराने ग्रासल्यानंतर आयुष्य संपविण्यासाठी घर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र लष्कर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्परता दाखवत महिला डॉक्टरचे प्राण वाचविले आहेत. यावेळी महिला डॉक्टरचे योग्यरित्या समुपदेशन केल्यामुळे त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय बदलला आहे. पोलिसांच्या या कार्याचे डॉक्टर महिलेच्या कुटूंबाने आभार मानले आहेत.

डॉ. नेहा (नाव बदलेले आहे.) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. नेहा या 49 वर्षाच्या असून, त्या एमबीबीएस आहेत. लष्कर परिसरातील एका रुग्णालयात त्या प्रॅक्टीस करतात. त्यांना एक मुलगा आहे. पती खासगी नोकरी करतात. दरम्यान त्यांना दुर्धर आजार झाल्याचे समजले. त्या नंतर त्यांनी त्या आजाराची धास्ती घेतली. त्यातून त्या मानसिक तणवात गेल्या. आजाराच्या खर्चासाठी त्यांना आर्थिक भार देखील पडत होता. त्यासाठी खर्च होत असल्याने सुमारे चार लाखांचे कर्ज देखील झाले होते. त्यांना काय करावे कळत नव्हते. अखेर त्यांनी अखेर आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. याच नैराश्यातून मुलाला त्यांनी शेवटा फोन करून मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असे सांगत फोन कट केला. आईच्या फोन नंतर मुलाच्या पाया खालील जमीनच सरकली. मुलाने तत्काळ घरी धाव घेतली. परंतु, आई घरी दिसत नसल्याने शोध घेतला. त्यावेळी घरात दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यात मला दुर्धर आजार झाला असून, यावर होणारा खर्च व आधी मी केलेले कर्ज यामुळे होणारे आर्थिक भुर्दंड यामुळे मी मानसिक तणावात आहे. यासह इतर लिखाण केले होते.

मुलाने या चिठ्ठ्या पाहून तत्काळ लष्कर पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. लष्कर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड तसेच उपनिरीक्षक कांबळे, अमोल गायकवाड, गणेश कोळी, समीर तांबोळी, कैलास चव्हाण, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने या महिलेचा शोध सुरू केला. त्यांचा मोबाईल बंद होता. परिसरातील सर्व हॉटेल्सची तपासणी केली. त्यातच तांत्रिक विश्लेषण केले असता महिला नाना पेठेतील एका हॉटेलात मिळून आली. तिला सुखरूप ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. तसेच, त्यांना समजावून सांगत त्यांचे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करत त्यांचे मतपरिवर्तन केले. तसेच आयुष्य संपविण्यापासून त्यांना परावृत्त करत सकारात्मक उर्जा निर्माण केली. त्यांनीही पोलिसांनी सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरवा करण्यास सहमती दर्शवली. यावेळी महिलेच्या कुटूंबाने पोलिसांचे मनापासून आभार मानले.

डॉ. महिलेचा सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून दोन तासात शोध घेतला. तिला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिला असे पाऊल उचलल्या बाबत विचारणा केली. तेव्हा महिलेनी सर्व हकिकत सांगितली. यावेळी तिचे समुपदेशन करून तिचे मनपरिवर्तन केले. तिला मुलांचा व कुटुंबाचा विचार करावा हा सल्ला दिला. तसेच मृत्यू हा उपाय होऊ शकत नाही. सध्या आधुनिक उपचार पध्दती आहेत. विविध सेवाभावी संस्थामार्फत उपचार केले जातात असेही सांगितले. यावेळी डॉ. सतिश पवार यांच्याशी बालेण करून दिले. त्यांनीही महिलेला समजून सांगितले.
– अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे.

Back to top button