खडकवासलातील रस्ते खड्डेमय | पुढारी

खडकवासलातील रस्ते खड्डेमय

किरकटवाडी : खडकवासला धरण चौकात आणि गावात सिंहगड पानशेत रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे सिंहगड – पानशेत परिसरात पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांना आणि या परिसरातील गावकर्‍यांना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गावाचा महापालिकेत समाविष्ट होऊनही गावाच्या व्यथा तशाच कायम आहेत. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेले खडकवासला गाव पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजले जाते. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी खडकवासला पानशेत परिसरात येणार्‍या पर्यटकांमुळे खडकवासला धरण चौपाटी गजबजलेली असते.

खडकवासला धरण किनार्‍याच्या चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे दुचाकीचालकांसह वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. येथून नियमित दुचाकीवरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या पाठीच्या मणक्याचे आणि शारीरिक आजारही वाढले आहेत. धरण किनार्‍यावरील चौकात अद्यापर्यंत महापालिकेत समावेश होऊनही तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवण्याचा खटाटोप महापालिकेने केला आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने खडकवासला गावातील आणि धरण चौकातील खड्डे त्वरित बुजवून त्वरित उपाययोजना कराव्यात, नाहीतर खड्ड्यांत झाडे लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंच्या युवक आघाडीच्या कुणाल सरोदे यांनी दिला.

 

Back to top button