पिंपरी : महिला बचत गटांना शिलाईचा रोजगार | पुढारी

पिंपरी : महिला बचत गटांना शिलाईचा रोजगार

मिलिंद कांबळे

पिंपरी : राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात प्लास्टिक पिशव्या व वस्तू वापरास बंदी आहे. त्याला पर्याय म्हणून दुकानदार व नागरिकांना कापडी पिशव्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून महापालिकेच्या वतीने ‘नवी दिशा शिलाई’ हे नवीन युनिट सुरू केले आहे. महिला बचत गटांद्वारे या युनिटमध्ये कापडी पिशव्या बनविल्या जाणार आहे. त्या संपूर्ण शहरात अल्प दरात दुकानदार व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

थेरगाव येथील एका युनिटची सुरुवात आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते झाली. वापरलेल्या कापडापासून या पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात थेरगाव व भोसरी येथे युनिट सुरू केले जाणार आहे. एका युनिटमध्ये 10 शिलाई मशिन, 1 वॉशिंग मशिन व 1 ड्रॉयर मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पालिका शिलाई मशिन, जागा, वीज व पाण्याची सुविधा देणार आहे.
बचत गटांच्या विशेषत: कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना त्यासाठी प्राधान्य दिले आहे. एका शिलाई मशिनवर एका तासात 15 पिशव्या तयार होतात. सध्या दररोज 4 तास शिलाईचे काम सुरू केले आहे.

चार तासात 10 मशिनवर 600 पिशव्या तयार होता. ती वेळ हळूहळू वाढविली जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय तसेच, प्रभागात एक युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. एका छोट्या पिवशीसाठी 6 व मोठ्या पिशवीसाठी 12 रूपये शुल्क पालिका बचत गटास देणार आहे. तयार झालेल्या कापडी पिशव्या वेडींग मशिनमध्ये उपलब्ध आहेत. असे एकूण 100 मशिन शहरात विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत. तेथे एक पिशवी 5 व 10 रूपयास मिळणार आहे. नाणे टाकल्यानंतर मशिनमधून पिशवी बाहेर पडते. नाणे नसल्यास डीजिटल माध्यमातूनही पैसे अदा करण्याची सोय आहे.

दुसरीकडे, प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या दुकानदारांस दंडासह या कापडी पिशव्या दिल्या जाणार आहेत. तसेच, ज्यांच्याकडे ग्राहकांना देण्यासाठी पिशव्या नाहीत, त्या दुकानदारांना कापडी पिशव्या दिल्या जाणार आहेत. तसेच, नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशवीचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

शिलाईच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत
‘नवी दिशा शिलाई’ युनिट ही योजना महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी उपयुक्त आहे. पालिकेने आम्हाला शिलाईचे प्रशिक्षण दिले आहे. त्या माध्यमातून स्वाभिमानाने मिळणारे उत्पन्नातून स्वत:चे कुटुंब खंबीरपणे सांभाळण्यास सहाय होणार आहे, असे बचत गटाच्या प्रतिनिधी सुवर्णा भालेराव, आशा रणखांबे यांनी सांगितले.

वापरात नसलेले कपडे घंटागाडी चालकांकडे द्या!
घरात वापरात नसलेले कपडे एका पिशवीत भरून घंटागाडीचालकाकडे द्यावेत, असे आवाहन महापालिकेने शहरातील नागरिकांना केले आहे. ते कपडे धुवून व सुकवून निर्जंतूक करून पिशव्या तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत.

महिलांच्या हातून पर्यावरण, समाजाची सेवा घडणार
गरजू महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा महापालिकेचा प्रयत्न आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. या महिलांच्या हातून एक प्रकारे पर्यावरण व समाजाची सेवा घडणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

बचत गटांना हेही कामे
महिला बचत गटांना पालिकेकडून विविध कामे थेट पद्धतीने देण्यात येत आहेत. त्यात सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व दुरूस्तीचे काम आहे. तसेच, ओला व सुका कचरा विलगीकरण तसेच,खत निर्मितीसाठी त्याचे सहाय घेण्यात येत आहे.

Back to top button