पुणे : पत्नी, मुलाचा खून करणारा गजाआड | पुढारी

पुणे : पत्नी, मुलाचा खून करणारा गजाआड

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा : आण्णापूर (ता. शिरूर) येथील येवले माथाजवळील शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये 8 दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा व तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता, त्या प्रकरणात पत्नी व मुलाचा खून करणार्‍यास अटक करण्यात पोलिसांना यश
आले आहे.

विविध वृत्तपत्रे, सोशल मीडियाद्वारे फोटोसह प्रसिद्धी देऊनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरूर पोलिस स्टेशनपुढे हा खून की आत्महत्या हे गूढ उकलणे व खरा आरोपी गजाआड करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

टाकळी हाजीचे सरपंच दामूशेठ घोडे यांचा स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क असल्याने व त्यांनी या महिलेचे व तिच्या बालकाचे फोटो माहितीसह स्टेट्सला ठेवल्याने या घटनेची माहिती काही बाहेरगावातील कामगारांमार्फत घोडे यांना समजताच त्यांनी सहायक फौजदार नजिम पठाण यांना कळवली.

पठाण यांनी तत्काळ जलद गतीने तपास यंत्रणा राबवून मृत महिलेचा पती योगेश संभाजी कुर्‍हाडे (रा. पैठण, जि. औरंगाबाद) याला अटक केली. तो मलठण (ता. शिरूर) येथून फरार होता. त्याने खून केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. खरा आरोपी गजाआड केल्याने मृत माय-लेकांना न्याय मिळणार आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण यांनी या तपासाप्रकरणी सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले होते.

Back to top button