कुरकुंभच्या सरपंचपदी राहुल भोसले कायम; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | पुढारी

कुरकुंभच्या सरपंचपदी राहुल भोसले कायम; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर राहुल हनुमंत भोसले कायम राहणार आहेत. कुरकुंभच्या सरपंचपदाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने भोसले यांची निवड कायम ठेवली असून, याबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत. राहुल भोसले हे थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते. कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सन 2018 च्या निवडणुकीत, दिलेल्या मुदतीत विहित पद्धतीने निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर केले नाही, असा ठपका भोसलेवर होता. विभागीय आयुक्त आणि उच्च न्यायालयाने त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरविले होते.

या निर्णयानंतर कुरकुंभ सरपंचपदासाठी पुन्हा निवडणुक पार पडली. सदस्याच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत भोसले यांचे जवळचे सहकारी आयुब सल्लाद्दीन शेख सरपंचपदावर विराजमान झाले. याविरोधात भोसले यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अपात्रेतेचा आदेश रद्द केला. या दरम्यान नूतन सरपंच आयुब सल्लाद्दीन शेख यांची निवड कायदेशीर ठरू शकत नाही, असे नमूद केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागास दिले आहेत.

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी पत्र काढून दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना याबाबत तातडीची अंमलबजावणी करण्याचे कळविले आहे. न्या. संजय किशन कौल व एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने भोसले यांचे सरपंचपद कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाचा अपात्रतेचा निर्णय रद्द केला. भोसले यांच्या बाजूने अ‍ॅड. गौरव अग्रवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी काम पाहिले.

Back to top button