पुणे : चिकन आणले नाही म्हणून डोक्यात दगड घालून खून | पुढारी

पुणे : चिकन आणले नाही म्हणून डोक्यात दगड घालून खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चिकन न आणल्याच्या कारणातून झालेल्या वादात शेजार्‍यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे. शंकर नायक (वय 35, सध्या रा. रानवारा हॉटेलसमोर, वाडेबोल्हाई-केसनंद रस्ता, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शेजारी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नायक यांची पत्नी मेहबू यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायक आणि आरोपी भोसले दाम्पत्य शेजारी आहेत. पाल टाकून ते येथील परिसरात वास्तव्यास आहेत. नायक यांना आरोपींनी चिकन आणण्यास सांगितले होते. चिकन न आणल्याने आरोपी नायक यांच्यावर चिडले. नायक यांची पत्नी मेहबू आणि मुलीला आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली. भांडणात शंकर नायक यांनी मध्यस्थी केली. त्या वेळी विकास आणि साथीदारांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार तपास करत आहेत.

Back to top button