पिंपरी :‘आंद्रा’तील पाण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त, काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना | पुढारी

पिंपरी :‘आंद्रा’तील पाण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त, काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी लिटर इतके पाणी आणण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या 24 ऑगस्टपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक उच्च दाब क्षमतेची वीजजोडणी पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानंतर सप्टेंबर अखेर अर्थात घटस्थापनेच्या मुहूर्तावर शहरवासीयांना आंद्रा धरणाचे पाणी मिळू शकणार आहे.
त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी संबंधित प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. तसेच, या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. महापालिकेकडून निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र या ठिकाणी पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

प्रकल्पासाठी 22 केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नदीजवळ उपसा करुन पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. तसेच, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या 20 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तपासणी केल्यानंतर सप्टेंबर अखेर शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

शहरवासीय पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील
पिंपरी-चिंचवडसाठी सध्या पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी पाणीपुरवठ्याचे अन्य स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपचे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला देण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. कोविडचे संकट आणि त्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिका प्रशासनाला अडचणी आल्या. अखेर सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button