पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पालिका बांधणार; हॉस्पिटल व वसतिगृह पीपीपी तत्त्वावर | पुढारी

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पालिका बांधणार; हॉस्पिटल व वसतिगृह पीपीपी तत्त्वावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नायडू रुग्णालयाच्या जागेवर होणारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बांधली जाणार आहे. यासाठी येणार्‍या 147 कोटींच्या खर्चास शुक्रवारी मान्यता देण्यात आली. हॉस्पिटल आणि विद्यार्थ्यांचे वसतिगृह मात्र खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने यंदापासून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

हे महाविद्यालय सध्या मंगळवार पेठेत सुरू असले, तरी नायडू हॉस्पिटलच्या साडेबारा एकर जागेत महाविद्यालयाची कायमस्वरुपी इमारत आणि विद्यार्थ्यांच्या सरावासाठी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयासह आवश्यक असणारी इमारती, वसतिगृह आणि हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर बांधण्याचे नियोजन यापूर्वी केले होते.

मात्र, महाविद्यालयाच्या संदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय महापालिकेच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 147 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र, हॉस्पिटल आणि विद्यार्थ्यांचे वसतिगृह पीपीपी तत्त्वावरच बांधण्याचा निर्णय घेतला.

 डॉ. नायडू रुग्णालयाचे बाणेरला स्थलांतर
माागील शंभर वर्षात प्लेग, सार्स, स्वाईन फ्लू आणि सध्याच्या कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये डॉ. नायडू सांसर्गिक उपचार रुग्णालय वरदान ठरले आहे. मात्र, या रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि रुग्णालय, वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यामुळे डॉ. नायडू रुग्णालयाचे स्थलांतर बाणेर येथील डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Back to top button