पिंपरी : ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष पाहूनच मूर्ती बुकिंगला पंसती | पुढारी

पिंपरी : ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष पाहूनच मूर्ती बुकिंगला पंसती

पिंपरी : ऑनलाइन शॉपिंगच्या जगात गणेशोत्सवात मात्र ऑफलाइन पद्धतीनेच गणेश मूर्तीची बुकिंग होताना दिसत आहे. प्रत्यक्ष पाहण्यात आणि फोटोत फरक असल्याने ऑनलाइन विक्रीमध्ये वादाच्या घटना घडतात. त्यामुळे ग्राहकदेखील प्रत्यक्ष पाहूनच गणेशमूर्तीचे बुकिंग करताना दिसत आहेत.

सध्या डिजिटल युगात सर्व वस्तू ऑनलाइन बुकिंग करुन घरपोच मिळतात. त्यामुळे ग्राहकाला हवी ती वस्तू ऑर्डर करुन मिळविता येते. यामध्ये गणेशमूर्तीदेखील आहेत. मात्र, ग्राहकाला मूर्ती स्वत: प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय खात्री पडत नसते. मूती ही सर्व चारीही बाजूंनी व्यवस्थित कुठेही तोडफोड झालेली नसावी, अशी अपेक्षा असते. त्यामुळे ऑनलाइन मूर्ती मागविताना ती ग्राहकांपर्यंत कोणत्या स्थितीत येईल याची खात्री नसते. त्यामुळे ऑनलाइन मूर्ती मागविण्यात शाशंकता असते.

ऑनलाइन बुकिंगला लागते 17 टक्के जीएसटी
गणेशमूर्तींची विक्री करणार्‍या दुकानदारांनीच ऑनलाइनला बुकिंग हा पर्याय ठेवला नाही. कारण ऑनलाइन बुकिंगला दुकानदारांना 17 टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना बँकेकडून भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे आम्ही मूर्तींची ऑनलाइन विक्री करत नसल्याचे दुकानदार सांगतात.

प्रत्यक्ष पाहण्यात पडतोय फरक
बर्‍याचदा ग्राहक ऑनलाइन मूर्तीचे बुकिंग करतात. ऑनलाइन पाहण्यात आणि प्रत्यक्ष पाहण्यात फरक असतो. जेव्हा मूर्ती घेण्यास येतात त्यावेळी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष दिसण्यात खूप फरक आहे. आम्ही पसंत केलेली ही मूर्ती नाही असे म्हणून वादवादीच्या घटना होतात. त्यामुळे ग्राहकांनी प्रत्यक्ष येवून दुकानातील मूर्ती पसंत करुन बुकिंग करावे हीच पद्धत योग्य असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

आमच्याकडे शंभरातील एक जण फक्त ऑनलाइन बुकिंग करतो. इतर सर्व प्रत्यक्ष येऊन बुकिंग करून जातात. ऑनलाइनमध्ये आम्ही चारही बाजूंनी मूर्ती दाखविली तरी ग्राहकाला ती प्रत्यक्षच पाहायची असतेे. जास्तीत जास्त ग्राहक समोरासमोर पाहूनच बुकिंग करतो.
                                                    – कपिल कुंभार, मूर्तीकार

ऑनलाइनमध्ये आम्हाला 17 टक्के जीएसटी लागते. हा सण वर्षातून एकदा येत असतो. मग आम्ही तर फोटो असे पाहिले होते आणि मग आता मूर्ती अशी का दिसते? त्यामुळे विनाकारण वाद होतात. त्यामुळे आम्ही आनॅलाइन विक्री करतच नाही.
                                                     – रवींद्र चित्ते, मूर्तीकार

Back to top button