‘वीर’च्या विसर्गाने निरा नदीला पूर; नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त मंदिरात पाणी शिरले | पुढारी

‘वीर’च्या विसर्गाने निरा नदीला पूर; नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त मंदिरात पाणी शिरले

निरा : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील वीर धरण मंगळवारी (दि. 9) 100 टक्के भरले. धरणाचे पाणी वाढत गेल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. निरा (ता. पुरंदर) गावच्या हद्दीवरून वाहणार्‍या नदीला पूर आल्याने निरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त मंदिरात पाणी शिरले. वीर धरणात पाण्याची कमालीची वाढ होऊ लागल्याने मंगळवारी विसर्गात वाढ करून धरणाच्या पाच दरवाजांतून 24 हजार 385 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सोडण्यात आला.

त्यामुळे निरा नदीला पूर आला. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात माउलींच्या पादुकांना निरा नदीवरील प्रसिद्ध श्रीक्षेत्र दत्त मंदिराच्या घाटावर ज्या ठिकाणी स्नान घातले जाते, त्या घाटाच्या पायर्‍या बुधवारी (दि. 10) पहाटेपासून पाण्याखाली बुडून दत्त मंदिरात पाणी शिरले. तसेच दशक्रियाविधी घाटही पाण्याखाली बुडाला. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना दशक्रियाविधी निरा नदीच्या बि—टिशकालीन पुलाजवळ करावा लागला. दरम्यान, निरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना वीर धरण प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

Back to top button