पुणे : दारू पिण्याच्या वादात केला मित्राचाच खून | पुढारी

पुणे : दारू पिण्याच्या वादात केला मित्राचाच खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दारू पिताना झालेल्या वादात डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिल राजू सासी (वय 33, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ अक्षय राजू सासी (वय 25, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण नामदेव नाईक (वय 41, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. हा प्रकार वैदवाडी कॅनॉलजवळ 2 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिल हे दोघे मित्र होते. दोघेही मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात. 2 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोघेही वैदवाडी कॅनॉलजवळील नर्मदाबाई कांबळे शाळेच्या मागे दारू पिण्यास बसले होते. तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली. त्याचा राग मनात धरून प्रवीणने अनिलच्या डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने मारले. त्यात अनिल गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या कलमाच्या गुन्ह्यात समावेश करून प्रवीण नाईकला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक डांगे तपास करीत आहेत.

Back to top button