पिंपरी :  मुदतपूर्वीच बदली केल्याने कामाचा खोळंबा | पुढारी

पिंपरी :  मुदतपूर्वीच बदली केल्याने कामाचा खोळंबा

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  नियमानुसार सलग तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली केली जाते. मात्र, प्रशासक व आयुक्तांनी काही ठराविक अधिकार्‍यांची मुदत संपण्याच्या आतच पूर्वीच्या मलईदार विभागात बदली केली आहे. अचानक बदल्या केल्याने कामाचा खेळखंडोबा होत असल्याची तक्रार नागरिकांसह माजी नगरसेवकांनी केली आहे.
महापालिकेच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका विभागात काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची दुसर्‍या विभागात बदली केली जाते.

त्यानुसार आयुक्त पाटील यांनी मागे अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा मोठा दणका बसला होता. आयुक्तांच्या या ठोस भूमिकेचे शहरातून स्वागत झाले.
मात्र, प्रशासकीय राजवटीत आयुक्त आपलेच निर्णय फिरवत असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी बदली केलेल्या ठराविक अधिकार्‍यांना त्यांच्या जुन्या विभागात पुन्हा रूजू करून घेण्यात आले आहे.

कामकाजाबाबत गैरसोय होत आहे. अधिकारी बदलल्याने नवीन अधिकार्‍यांना कामकाज समजून घेण्यास अधिक वेळ जातो. परिणामी, कामास विलंब होत आहे. गैरसोय व विलंब होत असल्याने नागरिकांसह माजी नगरसेवक संताप व्यक्त करीत आहेत.
मोजक्याच अधिकार्‍यांची पुन्हा पूर्वीच्या जागी बदली करण्यामागे काय हेतू आहे. पूर्वी केलेली बदली ही चुकीची होती काय, आता अचानक त्या अधिकार्‍यांची बदली करण्यामागे कोणते नियोजन आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

अचानक बदलीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्रभागातील कामांसाठी स्थापत्य विभागात गेलो असता संबंधित अधिकार्‍यांची बदली झाल्याचे समजले. आता कोणाशी संपर्क साधायचा हे समजत नाही. कामाचा अक्षरश: खोळंबा झाला आहे. प्रभागातील तक्रारी घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे वारंवार जाणे सोईचे वाटत नाही. मुदतीपूर्वी ठराविक अधिकार्‍यांची पुन्हा आहे त्या ठिकाणी बदली केल्याने काही तरी आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे. या नियमबाह्य बदलीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे, असे भाजपचे माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी सांगितले.

Back to top button