काँग्रेसचे अखेर ठरलं..! रायबरेलीतून राहुल गांधी, अमेठीतून किशोरीलाल शर्मा निवडणूक लढवणार | पुढारी

काँग्रेसचे अखेर ठरलं..! रायबरेलीतून राहुल गांधी, अमेठीतून किशोरीलाल शर्मा निवडणूक लढवणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने शक्रवारी (दि.३ मे) जाहीर केले. गेल्या काही दिवसांच्या सस्पेन्सनंतर काँग्रेसने शुक्रवारी राहुल गांधी यांची उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. रायबरेलीत राहुल गांधी यांची लढत भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी होणार आहे. तर काँग्रेसकडून किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.

राहुल गांधी आज शुक्रवारी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची लढत भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी होणार आहे. २०१९ मध्येही त्यांना पक्षाने या जागेवरून उमेदवारी दिली होती. पण सिंह यांचा सोनिया गांधी यांनी १.६७ लाख मतांच्या फरकाने पराभव झाला होता.

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीशिवाय, अमेठी आणि रायबरेलीच्या स्थानिक नेत्यांनीही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या जागांवरून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली होती.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीमध्ये भाजप नेत्‍या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले होते. तर सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्‍या. यंदा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांची नियुक्‍ती राज्‍यसभा सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती झाली आहे. यंदा राहुल गांधी हे मागील वेळे प्रमाणे यंदाही केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान आहे.

दोन्‍ही मतदारसंघात आज अर्ज दाखल करण्‍याची अंतिम मुदत

अमेठी आणि रायबरेली मतदारसंघामध्‍ये २६ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची अंतिम तारीख शुक्रवार, ३ मे आहे. अर्ज दाखल करण्‍यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी राहिला असताना काँग्रेसने या दोन्‍ही मतदारसंघात उमेदवारी जाहीर केले नव्‍हते. अमेठी मतदारसंघातून भाजपने पुन्‍हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्‍यांनी २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जही दाखल केला.


हेही वाचा : 

Back to top button