‘एनआरआय’ना पुणेरी शिक्षणाची ‘क्रेझ’; शालेय शिक्षणासाठी मिळतेय शहराला अधिक पसंती | पुढारी

‘एनआरआय’ना पुणेरी शिक्षणाची ‘क्रेझ’; शालेय शिक्षणासाठी मिळतेय शहराला अधिक पसंती

दिगंबर दराडे

पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण आपण अनेक वेळा ऐकली आहे. जागतिकीकरणानंतर अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असल्याचे वास्तव आपणास पाहायला मिळाले आहे. अनेकांनी परदेशामध्येच नोकरी करण्याला पसंती दिली आहे. मात्र, परदेशामध्ये स्थायिक असलेले अनेक भारतीय आता त्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणाकरिता पुण्याला पसंती देत आहेत. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. अनेक यशस्वी माणसांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात पुण्यातून केली आहे. आपले व्यावसायिक भवितव्य उच्च शिक्षणाच्या निवडीवर अवलंबून असते. आजच्या तरुणांना खूप चांगल्या संधी देश-परदेशांत उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रम, विद्यापीठ आणि देशाची निवड करताना विविध घटक लक्षात घ्यावे लागतात. शिक्षणाचा दर्जा, विद्यापीठाची प्रतिष्ठा, नोकरीच्या संधी आणि शिक्षणाचा खर्च. या बरोबरच पाल्याची सुरक्षितता, परकी भाषेवरील प्रभुत्व, त्या देशाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती याही बाबी कळीच्या ठरतात. याच निकषांवर परदेशात संधी निर्माण होतात. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार्‍यांचा टक्का अधिक आहे.

इंजिनिअरिंगनंतर जर्मनीत नोकरीसाठी आलो. या ठिकाणी असलेले उच्च शिक्षण चांगले आहे. भारतातील शालेय शिक्षणाला जगामध्ये कुठेच तोड नाही. भारतातील शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मुलांवर संस्कार करण्यात येतात. आई-वडिलांविषयी मुलांमध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना राहते. हे संस्कार जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेले तरी मुलांना चुकीच्या मार्गापासून वाचवतात. आम्ही जरी सहकुटुंब जर्मनीमध्ये राहत असलो तरी आम्ही आमच्या मुलांना पुण्यामध्येच शिक्षण देत आहोत. आमच्यासारख्या अनेक पालकांनी आपल्या मुलांना भारतात शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

                                                                           – जीवन करपे, जर्मनी

आम्ही मागील दहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहोत. आमची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. आजी आजोबांचे संस्कार त्यांच्यावर होत आहेत. आम्ही नोकरीनिमित्त येथे राहत आहोत. वर्षातून दोन वेळा भारतात येतो. आमची मुले पुण्यातील शाळेत शिकल्याने खूप संस्कारीत झाली आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे शिक्षणदेखील पुण्यातच झाले आहे.

                                                                                      रोहित शहा, लंडन

परदेशी भारतीयांनी त्यांच्या मुलांना पुण्यात शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. लहान मुलांना त्या वयात जे संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात. त्यांची आकलन क्षमता या वयात अधिक असते. योग्य बाबी दिल्यास निश्चितपणे त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल.

                                                                      – डॉ. अरुण अडसूळ, शिक्षण तज्ज्ञ

Back to top button