चहा पाजू! का नको? आता कुणाचे आरक्षण निघते काय माहीत | पुढारी

चहा पाजू! का नको? आता कुणाचे आरक्षण निघते काय माहीत

निमोणे; पुढारी वृत्तसेवा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाचं भिजत घोंगडं दरदिवस नव्याच पद्धतीने समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी कोर्टाने सांगितले की, नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाला आरक्षण नाही… सगळीकडे झाले, आता काय अनुसूचित जाती- जमातीच्या काही जागा सोडल्या, तर सगळ्या जागा खुल्या वर्गासाठीच… महिला येऊ नाही तर पुरुष आमचं ठरलं !

दशक्रिया, लग्नविधीपासून तेराव्यासारख्या घरगुती कार्यक्रमाला पण जाणीवपूर्वक भेटीगाठी वाढू लागल्या, त्यातच आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गण आणि गटात फेरबदल करून पाच – दहा जागा वाढवल्यामुळे तू तिकडे बघ – मी इकडे बघतो… कशाला वाद घालायचा, जसं जमेल तसं एक दुसर्‍याला मदत करू; शेवटी आपण पाव्हणं… सोयरच आहोत.. आता तिसरे कुणी थोडंच मधी येणार आहे, या भावनेने अनेक गड्यांनी हात मोकळा सोडला… आयपीएलच्या धरतीवर गावोगावी क्रिकेटची मैदानं भरली.

काही ठिकाणी कुस्त्यांची दंगल झाली… सगळं काही सुरुळीत सुरू असताना आघाडी सरकारचा घात झाला. नवीन शिंदे सरकार आल्या आल्या कोर्टाचा निर्णय आला… नागरिकांच्या मागास प्रवर्गाला पण आरक्षण… आणि दुसर्‍याच आठवड्यात गण आणि गटाचे आरक्षण पण जाहीर झाले, अनेक ठिकाणी मातब्बरांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, तर अनेक गणात आणि गटात बिनचेहर्‍यांच्या माणसांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली. इच्छुक उमेदवार कुणीही असो, गरीब की श्रीमंत. एकदा का तो मैदानात येणार हे उघड झाले की, गावगाड्यात त्या गड्याला लवकर घेरला जातो… जशी त्याची ऐपत तशी हॉटेलची बैठक रंगत जाते.

अनुसूचित जाती, जमाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील संभाव्य उमेदवार ढाबा किंवा हमरस्त्यावरील हॉटेलात नियोजनाची बैठक करू शकत नसले, तरी गावोगावच्या टपरीवजा हॉटेलमध्ये सकाळ – संध्याकाळच्या नियोजनाच्या बैठका रंगू लागल्या होता… भावी सदस्य या एकाच आशेवर आर्थिक ऐपत नसतानाही बहुतांशी मंडळी दररोज पाच- पन्नास चहा पाजत असल्याचे चित्र हे मागील काही दिवसांपासून नित्याचे झाले होते.

…खिशात दमडी नसली तरी उधार उसनवार करून बैठक रंगतदार केली जात होती.. अन् परत एकदा माशी शिंकली.. सरकारने निर्णय बदलला.. गण आणि गटाची संख्या कमी करायची म्हणजे परत आरक्षण सोडत… आजपर्यंत आरक्षण आपल्या प्रवर्गासाठी आहे म्हणून ऐपत असो की नसो, जो दोन- दोन हाताने खर्च सुरू होता तो एका झटक्यात पाण्यात गेला… चहा पिणारे आता कुणाचे आरक्षण निघते काय माहीत याच्यावर जर काथ्याकुट करत असतील, तर यांना चहा पाजू का नको, याच मनस्थितीत बहुतांशी इच्छुक आले आहेत.

Back to top button