भीमाशंकर : आदिवासी भागात धोकादायक गावांचे सर्वेक्षण | पुढारी

भीमाशंकर : आदिवासी भागात धोकादायक गावांचे सर्वेक्षण

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: मंगळवारी (दि.2) सकाळपासून मेघोली, काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी) या परिसरातील धोकादायक गावांमध्ये जाऊन वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी नियोजित जागेचे सर्वेक्षण केले. अहवाल तयार झाल्यावर जागा योग्य की, अयोग्य आहे हे सांगितले जाईल, असे सांगितले. सर्वेक्षणानंतर वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी नियोजित जागा निवासासाठी प्रथमदर्शनी बरी दर्शवली आहे. मात्र, अहवाल आल्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे सांगितले. सर्वेक्षणामुळे पुनर्वसनाला गती मिळणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

या वेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, भारती भूवैैज्ञानीक सर्वेेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रामिता दासरवार व जगदिश हिंदयार, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, वन विभागाचे अधिकारी प्रवीण लांघी, वनरक्षक मंगल काळे, संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. धोकादायक गावांच्या नियोजित जागांची पाहणी करताना वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी लोकांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. तपासणीमुळेच काम रखडले होते. आता जलद- गतीने भूखंड पाडुुुन नियोजित जागेत लोकांना सुख-सुविधा देण्याचा मानस आहे.

या ठिकाणी लोकांना निवास व शेती करणे सोईचे होईल, असे पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले. गावांच्या पुनर्वसनासाठी येथील नागरिकांकडून तत्काळ मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून नुसत्या पहाण्या व गावबैठकी झाल्या, परंतु ठोस उपाययोजना केली नाही. याच गोष्टीकडे गेली 8 वर्षे दुर्लक्ष झाल्याने अनेक वेळा पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी तात्पुरते हलवले जाते. असे किती दिवस करणार ? असा सवाल नागरिकांनी संजय गवारी यांना विचारला.

 

Back to top button