कोंढवा : पर्वती जलकेंद्र आगीतील जखमी कर्मचार्‍याचा मृत्यू | पुढारी

कोंढवा : पर्वती जलकेंद्र आगीतील जखमी कर्मचार्‍याचा मृत्यू

कोंढवा; वार्ताहर: कामगारांमध्ये लाडके, ग्रामस्थांमध्ये मिळून मिसळून राहणारे लाला बांदल यांची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर बुधवारी (दि.3) सकाळी अपयशी ठरली. पर्वती जलकेंद्रातील टँकर पॉइंटशेजारील पंप चालू-बंद करण्याच्या नियंत्रण खोलीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या घटनेत बांदल गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडाचीवाडी येथील शेतकरी कुटुंबातील लाला गणपत बांदल गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पालिकेत काम करीत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरच्यांचा निरोप घेऊन ते बाहेर पडले होते.

पालिकेने नेमलेल्या महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रातील टँकर पॉइंटशेजारील पंप चालू- बंद करण्याच्या नियंत्रण खोलीत ते गेले आणि काळाने घात केला. या घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा आदेश व त्यांच्या नातेवाइकांनी सूर्या हॉस्पिटल गाठले. समोर बांदल यांची अवस्था पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. पाहता पाहता हॉस्पिटलसमोर वडाचीवाडी गावचे ग्रामस्थ व बांदल यांचा भला मोठा परिवार जमला. अनेक जण हळहळ व्यक्त करीत होते, तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात वडाचीवाडी येथे बांदल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. ‘एका निष्पाप व्यक्तीचा जीव हलगर्जीपणाने गेला. घरातील एकमेव कर्ता पुरुष गेला,’ अशा भावना पंचक्रोशीत व्यक्त होत आहेत. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे.

Back to top button