पुणे : द्राक्ष निर्यातवाढीसाठी नारायणगावला प्रशिक्षण | पुढारी

पुणे : द्राक्ष निर्यातवाढीसाठी नारायणगावला प्रशिक्षण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: द्राक्ष निर्यातविषयक क्षमता वृध्दीसाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या पुढाकाराने नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात येत्या शनिवारी (दि. 6) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील अधिकाधिक द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार व विभागीय उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन यांनी केले आहे.

कृषी पणन मंडळाचे पुणे विभागीय कार्यालय, कृषी विभाग, मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, द्राक्ष बागायतदार संघ व जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. कृषी निर्यात धोरणाची अंमलबजावणी करताना कृषिमाल निर्यात वृध्दीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, योजनाही राबवित आहे.

त्यानुसार, राज्यात द्राक्षे, डाळिंब, केळी या क्लस्टर्समधील क्षमता वृध्दीकरिता राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत क्लस्टर्समधील शेतकरी, पणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार, प्रक्रियादारांना निर्यातविषयक क्षमता वृध्दीकरिता हा प्रशिक्षण कार्यकम आयोजित करण्यात आला आहे.

Back to top button