पुणे : माण, सपकळवाडी ठरले कोरोनामुक्त | पुढारी

पुणे : माण, सपकळवाडी ठरले कोरोनामुक्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेतही जिल्ह्यातील अनेक गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखले. अशा गावांना ‘कोरोनामुक्त गाव’ पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा उपस्थित होते. कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंतर्गत माण (ता. मुळशी) आणि सपकळवाडी (ता. इंदापूर) या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या गावांनी कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोव्हिड हेल्पलाइन पथक आदींच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केले आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवायोजनेच्या वतीने अंगणवाडी केंद्रातून पोषकतत्त्वयुक्त आहाराअंतर्गत हॉर्लिक्स वाटपाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेने कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत हिंदुस्थान युनिलिव्ह सोबत सामंजस्य करार केला आहे. कंपनी वर्षभर मोफत हॉर्लिक्स पुरवणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात बालकांना हॉर्लिक्सचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांच्या आहारात आवश्यक त्या प्रमाणात सूक्ष्म पोषकतत्त्वे, जीवनसत्त्वे आदी पोषक तत्त्वांचा समावेश व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Back to top button