पुणे : मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची हजेरी | पुढारी

पुणे : मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची हजेरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साडेनऊ वाजता गाड्यांच्या सायरनचा आवाज आला… मुख्यमंत्री आले… मुख्यमंत्री आले म्हणून नागरिकांनी गलका केला… पोलिस सरसावले… मात्र गाडीतून मुख्यमंत्र्यांऐवजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उतरले. त्यांच्यानंतर अर्धा तासाने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ येथे आगमन झाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याच्या नियोजनात सातारा रस्त्यावरील मठात येण्याचे नव्हते.

मुख्यमंत्र्यांच्या इतर सभा आणि भेटींमुळे त्यांचा दौरा उशिरा सुरू होता. आदित्य ठाकरे मठात पोहोचताच शिंदे गटाच्या समर्थकांचे चेहरे पडले, तर नागरिकांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. मठात जाऊन श्री सद्गुरू शंकर महाराज समाधीचे आदित्य यांनी दर्शन घेतले. हात उंचावत नागरिकांना अभिवादन करून ते निघून गेले. त्यांच्यानंतर अर्धा तासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मठात आले.
मुख्यमंत्र्यांचा ताफा आल्याबरोबर नागरिकांनी त्यांचेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच उपस्थित नागरिकांना अभिवादन करत मठात प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांचा सत्कार
श्री सद्गुरू शंकर महाराज मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सतीश कोकाटे, राजाभाऊ सूर्यवंशी, नीलेश मालपाणी व प्रताप भोसले उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मठामध्ये मी पुन्हा येतो, असे आश्वासित केले.

 

Back to top button