लोणावळा : अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांवर कारवाई | पुढारी

लोणावळा : अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांवर कारवाई

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा: अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍या 10 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी मागील तीन दिवसांत कारवाई केली आहे. लोणावळा शहरात बंगले भाड्याने देण्याचा व्यवसाय जोर पकडत आहे. मुंबई, पुण्याकडील धनदांडग्यांनी सेकेंड होम म्हणून बांधलेले बंगले आता पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. अनेकजण तर आता केवळ हा व्यवसाय करण्यासाठी बंगले खरेदी करताना दिसतात. केवळ लोणावळा शहराचा विचार केल्यास असे हजारो बंगले आहेत की जे भाडेतत्त्वावर दिले जातात आणि छोटे मोठे ग्रुप असेल तर हॉटेलपेक्षा हे बंगले भाड्याने घेणे पर्यटकांना ही परवडणारे असतात.

याशिवाय हॉटेलपेक्षा या बंगल्यांमधून पर्यटकांना अधिक स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे पूर्वी हॉटेल आणि रिसॉर्टकडे वळणारा पर्यटक खूप मोठ्या संख्येने या बंगल्याकडे वळू लागला आहे. एकीकडे अनेक नियम पायदळी तुडवीत हा व्यवसाय सुरू असताना दुसरीकडे मात्र याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मागील पंधरा दिवसांत लोणावळा शहरातील अशा बंगल्यांमध्ये दोन अपघाती मृत्यू झाले.

याशिवाय बहुतांश बंगले हे रहिवासी परिसरात असल्याने त्या ठिकाणी येऊन रात्रीअपरात्री धांगडधिंगा करणार्‍या पर्यटकांमुळे आजूबाजूच्या स्थानिकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा अनेक तक्रारी नेहमीच पोलिस ठाण्याला जात असतात. मागील पंधरा दिवसांत लोणावळ्यात दोन खासगी बंगल्यांमध्ये दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यानंतर खासगी बंगल्यांची कायदेशीरता व पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा प्रामुख्यांनी ऐरणीवर आल्याने पोलिस प्रशासनाकडून अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांवर कारवाई मोहीम हाती घेतली असल्याचे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सांगितले.

घरगुती वापरासाठी बांधले गेलेले बंगले व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त होत आहे. शिवाय अशा बंगल्यांमधून बंधण्यात आलेल्या अनाधिकृत स्विमिंगपूलचा सर्व्हे नगर परिषदेकडून करण्यात आला असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.

Back to top button