‘कोव्हिशिल्ड’चा तुटवडा कायम; नियोजनाअभावी मोहिमेवर परिणाम | पुढारी

‘कोव्हिशिल्ड’चा तुटवडा कायम; नियोजनाअभावी मोहिमेवर परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यात राज्याकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसींचा पुरेसा पुरवठा न झाल्याने लसीकरणावर परिणाम झाला. अजूनही तुटवड्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, मंगळवारी (दि. 2) महापालिकेच्या केवळ 5 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून लसींच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन न झाल्याने तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रांवर 15 जुलैपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसींची मागणी वाढली आहे. राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याला केंद्राकडून लस उपलब्ध न झाल्याने तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणत्या केंद्रांवर मिळेल कोव्हिशिल्ड लस?
1) कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
3) भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
4) कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
5) कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर

Back to top button