पुणे : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत राज्यात 106 टक्के पाऊस | पुढारी

पुणे : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत राज्यात 106 टक्के पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी वार्तालापात दिली. दरम्यान, कोकणात सर्वसाधारण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहील, असेही त्यांनी सांगितले. महापात्रा म्हणाले, या दोन महिन्यांत देशभरात सामान्य पाऊस पडेल. 94 ते 106 टक्के पावसाची शक्यता असून पश्चिम मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य, पूर्वेत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतीय राज्यात मात्र उर्वरित राज्यापेक्षा अतिवृष्टी होईल. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतील अंतिम टप्प्यातील पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी 1971 ते 2020 या कालावधीतील सांख्यिकीचा वापर करण्यात आला. कमी दाबाचे पट्टे वाढले… महापात्रा यांनी सांगितले, 2018 ते 2022 या कालावधीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, कमी दाबाच्या पट्ट्यांची संख्या वाढली आहे. मात्र या पट्ट्यांचा दीर्घ कालावधी झाल्याने कमी दिवसांत जास्त पाऊस, असे प्रमाण वाढले.

आगामी दोन महिन्यांत 422.8 मि.मी. पाऊस
आगामी दोन महिन्यांत दीर्घ पल्ल्याच्या पावसाचे अंदाज वर्तविताना डॉ. महापात्रा म्हणाले, या दोन महिन्यांच्या कालावधीत सरासरी 422.8 मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ऑगस्ट महिन्यात 254.5 मि.मी. एवढा सरासरी पाऊस पडेल. देशातील विविध भागांत कमाल व किमान तापमानात फरक राहील. ला-निना स्थिती सर्वसामान्य असून, त्याचा पावसावर फारसा परिणाम राहणार नाही, तर भारतीय सामुद्रिक स्थिरांक (आयओडी) स्थिर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Back to top button