पुणे-नाशिक रेल्वेमार्गात काही ठिकाणी बदल? ड्रोनद्वारे गुपचूप पाहणी | पुढारी

पुणे-नाशिक रेल्वेमार्गात काही ठिकाणी बदल? ड्रोनद्वारे गुपचूप पाहणी

चाकण; पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाने चाकण परिसरातील रासे, केळगाव (ता. खेड) वन विभागाच्या हद्दीत दारूगोळा नष्ट करण्याचे क्षेत्र असल्याने हरकत घेतली आहे. संरक्षण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर या जागेचा विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून या भागात अधिकारी ड्रोनद्वारे पाहणी करीत असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली आहे. त्यानंतर स्थानिकांनी या अधिकार्‍यांकडे कसून चौकशी केल्यानंतर काही ठिकाणी मार्गात थोडासा बदल होणार असल्याची बाब समोर आली आहे.

प्रकल्पाचे काही अधिकारी दोन दिवसांपासून रासे, कडाचीवाडी, आगरवाडी व राक्षेवाडी या भागांत पाहणी करण्यासाठी येत असल्यामुळे कडाचीवाडी (ता. खेड) येथील मंदिरामध्ये संबंधित अधिकार्‍यांना बोलावून याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली. काही ठिकाणी लष्कराने हरकत घेतली असल्यामुळे संबंधित संवेदनशील परिसर वगळून लगतच्या भागातून रेल्वेमार्ग नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना सांगितले आहे.

संबंधित अधिकारी हा सर्व्हे ड्रोनद्वारे करीत आहेत. आता काही ठिकाणी बदलणारा हा मार्ग नेमका कुठून जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असल्याने त्याला अचानक आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत प्रशासनाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.

Back to top button