पिंपरी : ‘आरटीई’च्या चौथ्या फेरीत 23 मुलांचे प्रवेश निश्चित | पुढारी

पिंपरी : ‘आरटीई’च्या चौथ्या फेरीत 23 मुलांचे प्रवेश निश्चित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गरीब विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रवेश दिला जात आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी सध्या सुरू असलेल्या चौथ्या फेरीत आजअखेर दिलेल्या मुदतीत 23 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान, या फेरीसाठी आता 30 तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत 2 हजार 677 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

तर, 578 जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी 22 तारखेपासून चौथी फेरी सुरू करण्यात आली. आज अखेर त्यासाठी मुदत होती. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक असल्याने त्यासाठी 30 तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली.

निवड यादीतील सोडत काढल्यानंतर 6 एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तीनदा मुदतवाढ देत 10 मे पर्यंत निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. ‘आरटीई’अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी 174 खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी एकूण 3 हजार 255 जागा रिक्त होत्या. त्यापैकी निवड यादीतील 2 हजार 23 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, प्रतीक्षा यादीत तिसर्‍या फेरीपर्यंत 654 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते.

Back to top button