महिलांची वाट बिकटच…! चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात वाढ चिंताजनक | पुढारी

महिलांची वाट बिकटच...! चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात वाढ चिंताजनक

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याने जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. बुधवारी (दि. 27) एकाच दिवशी तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने मागील सहा महिन्यांचा आढावा घेतला असता 81 जणांच्या गळ्यातील चेन ओरबाडून नेल्याची माहिती समोर आली. यामध्ये बहुतांश घटनांमध्ये महिला टार्गेट झाल्या आहेत. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरात महिलांची वाट बिकटच असल्याचे बोलले जात आहे.

शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पोलिसांना नामचीन टोळ्यांची मुस्कटदाबी करण्यात यश मिळाले आहे. मात्र, ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यात पोलिसांना अद्याप म्हणावे, असे यश मिळाले नाही. यामध्ये प्रामुख्याने ‘चेन आणि मोबाईल स्नॅचिंग’ हे सुरुवातीपासून पोलिसांसमोरचे एक मोठे आव्हान ठरत आहे. मागील महिन्यापासून चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. जून महिन्यात एकूण 46 ठिकाणी चेन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये आषाढीवारी दरम्यान देहू आणि आळंदी येथे घडलेल्या घटनांची संख्या मोठी आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 27) एमआयडीसी भोसरी, चिखली, वाकड परिसरातील महिलांचे दागिने हिसकावल्याचे समोर आले. या व्यतिरिक्त अलीकडे दुचाकीवर आलेले चोरटे बसची वाट पाहत असलेल्या नागरिकांसह प्रवासी महिलांना देखील टार्गेट करू लागले आहेत. महिलांच्या हातातील पर्स, लॅपटॉप, घड्याळ यासारख्या किमती वस्तू देखील ओढून नेल्याच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

233 जणांना लुटले
शहर परिसरात मागील सहा महिन्यांत 233 ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड असलेली पर्स यासह मौल्यवान वस्तू चोरट्यांनी हिसकावून नेल्या आहेत. विशेष करून चोरटे मॉर्निंग वॉक करणार्‍या महिलांना टार्गेट करीत आहेत. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद आहे.

आषाढी वारीत घडलेल्या घटनांमुळे या वर्षीच्या चेन स्नॅचिंगचा आकडा फुगल्याचे दिसत आहे. मात्र, तुलनेत यंदा चेन स्नॅचिंग कमी आहे. चेन, मोबाईल आदी प्रकारच्या जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

 

चोरट्यांना आयती संधी
नाकाबंदी किंवा गस्तीवरील पोलिस पादचारी महिलांना दागिने पदराआड झाकून घेण्यास सांगतात. अशा वेळी महिला नाक तोंड मुरडून दागिने झाकून घेण्याचे नाटक करून पुढे निघून जातात. मात्र, पुढे गेल्यानंतर लगेचच पुन्हा दागिने दिसतील, अशा पद्धतीने बाहेर काढतात. त्यामुळे महिलांच्या पाळतीवर घिरट्या घालत असलेल्या चोरट्यांना आयती संधी मिळते.

उकल होण्याचे प्रमाण40 टक्के
आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल असलेल्या 81 गुन्ह्यांपैकी 32 गुन्हे उघड आहेत. म्हणजेच चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण हे 40 टक्के इतकेच आहे. उर्वरित 60 टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

Back to top button