पुणे : उजनी धरणात 15 टीएमसी गाळ; पाणी साठवण्याची क्षमता घटली | पुढारी

पुणे : उजनी धरणात 15 टीएमसी गाळ; पाणी साठवण्याची क्षमता घटली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही वर्षापासून उजनीमध्ये सुमारे 15 अब्ज घनफूट (टीएमसी) गाळ साठला आहे. त्यामुळे या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणातही आतापर्यंत 3.84 टीएमसी गाळ साचला आहे.
गाळामुळे घटणारा पाणीसाठा लक्षात घेता मोठ्या धरणांमधील गाळ काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) राज्यासह देशभरातील विविध धरणांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला होता.

त्यामध्ये 93 प्रकल्पांचा अभ्यास करण्यात आला आहे. 93 पैकी 14 प्रकल्पांमध्ये जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जलसंपदा विभागाने अंदाजित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी होते. 21 प्रकल्पांत हे प्रमाण दुप्पट होते. मात्र, 17 धरणांत दोन ते तीनपटीने अधिक गाळ आला. 11 धरणांत तीन ते चार पट गाळ आला. सात धरणांत चार ते पाच पट गाळ आला, तर 23 धरणांत पाचपटपेक्षा जास्त जमिनीची धूप होऊन गाळ जमा झाला.

या अहवालात सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि पुणे जिल्ह्यातील भाटघर या धरणांचा समावेश होता. भाटघर धरणाचे पाणलोट क्षेत्र 331.50 वर्ग किलोमीटर आहे. त्यानुसार या धरणात 3.84 टीएमसी एवढा गाळ साचला आहे. या गाळामुळे 3.84 टीएमसीने पाणी कमी साठत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या पाच धरणांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चार जणांची समिती स्थापन
नाशिक येथील मेरीचे महासंचालक रा. रा. शहा यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती असून नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. सं. म. बेलसरे, जलविद्युत (स्थापत्य) गुणनियंत्रणचे मुख्य अभियंता सं. रा. तिरमनवार, पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे हे सदस्य असणार आहेत. तर, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Back to top button