पुणे : गुन्हेगारांकडून गुन्हेगाराचा खून; पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचे कारण | पुढारी

पुणे : गुन्हेगारांकडून गुन्हेगाराचा खून; पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचे कारण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावल्यानंतर दोघा गुन्हेगारांनी तिसर्‍या गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून केला. पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय 32, रा. पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने दोघांना अटक केली आहे.सुधीर ऊर्फ बंडू गौतम थोरात (वय 32, रा. कुंभारवाडा, सदाशिव पेठ), संदीप ऊर्फ सॅन्डी सुरेंद्र नायर (वय 28, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही घटना नवी पेठेतील पूना हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजता उघडकीस आली. याबाबत वैशाली गणपत जोरी (वय 30) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंंद जोरी हा बंडू थोरात याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत होता. त्याचा थोरात याला राग होता. जोरी हा दारूच्या नशेत थोरातला दिसला. त्यानंतर त्याने मित्र सँडी नायर याला सोबत घेऊन इतर मित्रासह बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आखाड पार्टी साजरी करण्याचा बेत आखला. त्यानुसार ते तेथे गेले. तेथे सर्वजण दारू प्यायले. इतर व्यक्ती तेथून निघून गेल्या. शेवटी थोरात, जोरी व सँडी हे तिघेच मागे राहिले होते. दोघांनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार केले.

या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तेथून पायी जात असलेल्या नागरिकास खुनाचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना खबर दिली. पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून उपलब्ध असलेल्या वस्तूजन्य पुरावा व खबर्‍यांनी दिलेल्या माहितीवरून आनंद जोरी याची ओळख पटविली. संदीप नायर व सुधीर थोरात हे संशयित धायरी भागात पळून गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडले. विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, कर्मचारी अनिकेत बाबर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, नीलेश साबळे यांच्या पथकाने केली.

तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
संदीप नायर याच्यावर गंभीर दुखापतीचे 2 व जबरी चोरीचे 1 असे 3 गुन्हे दाखल असून, त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सुधीर थोरात याच्या विरुद्ध गंभीर दुखापतीचे 2, घरफोडीचा 1, इतर चोरीचे 7 असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. तर आनंद जोरी याच्यावर घरफोडी चोरीचे 8, इतर चोरीचे 2, फसवणुकीचा 1, अमली पदार्थ 1, तडीपार आदेशाचा भंग केल्याचे 3 असे एकूण 15 गुन्हे आहेत. तिघेही एकमेकांचे मित्र होते.

Back to top button