पुणे : यंदा निर्बंध नकोत; गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा | पुढारी

पुणे : यंदा निर्बंध नकोत; गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करीत शासन आणि प्रशासनाला सहकार्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला परवानगी दिली असताना प्रशासनाकडून निर्बंध घातले जाऊ नयेत,’ अशी अपेक्षा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. पुण्याचा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो. कोरोनाकाळात प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन सर्वच गणेशोत्सव मंडळांनी साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा केला जाईल, अशी घोषणा केली.

परंतु, प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध घालण्याचा घाट घातला जात आहे. विसर्जन मिरवणुकीला बैलगाडीवर बंदी घालण्यात येणार असेल तर हे चुकीचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या रथाला बैलगाडीची परवानगी मिळते. त्यामुळे गणेश मंडळांच्या भावना समजून घेत प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याबाबत अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर म्हणाले की, प्रशासनाच्या वतीने नवीन नियमावली जाहीर केली असली तरी आमच्या मंडळाच्या वतीने नेहमी नियमात राहूनच उत्सव साजरा केला जातो.

त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीला बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर करीत आहोत. टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रथमपासूनच आम्ही कोणत्याही प्रकारच्या कमानी टाकत नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘गणेशोत्सवातील नियोजनाबाबत पोलिस आणि महापालिका प्रशासनाशी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या वेळी बैलगाडीचा हा मुद्दा उपस्थित झाला असून, त्यावर चर्चा करण्यात आली. दोन वर्षे गणेश मंडळांनी कोरोनाकाळात प्रशासनाला सहकार्य केले असून, या वर्षी प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांच्या निर्बंधयुक्त गणेशोत्सवाला प्रशासनानेही साथ द्यावी.’

Back to top button