पुणे : बचत गटांना चारशे कोटींचे कर्ज; गटांची संख्या पाच पटींनी वाढली | पुढारी

पुणे : बचत गटांना चारशे कोटींचे कर्ज; गटांची संख्या पाच पटींनी वाढली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 22 हजार 256 बचत गट आहेत. यामध्ये मागील दोन वर्षांत गटांची संख्या पाचपटीने वाढली आहे. कुटुंबाला हातभार बनलेल्या या महिलांच्या 13 हजारांहून जास्त बचत गटांसाठी चारशे कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील 22 हजार 256 पैकी 13 हजार 814 बचत गट हे कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत. सन 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये 13 हजार 814 बचत गटांना सुमारे चारशे कोटी रुपयांचे कर्ज देता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दोन वर्षांत 12 हजार बचत गटांची नव्याने स्थापना झाली आहे.

2020 पर्यंत जिल्ह्यात केवळ दहा हजार बचत गट कार्यरत होते. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत बचत गटांची संख्या पाचपटीने वाढल्याचे दिसले आहे. 2019 -20 मध्ये 58 कोटी, 2020-21 मध्ये 98 कोटी तसेच 2021-22 मध्ये 202 कोटी कर्ज वाटप करण्यात आले. उत्पादन निर्मिती किंवा उपजीविकेचे स्त्रोत शाश्वत करण्यासाठी कर्ज दिले जाते. हे कर्ज देताना किमान एक लाखांपासून ते 20 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. किमान पंधरा लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. तीन लाखाच्या पुढे प्रकल्प अहवाल द्यावा लागतो. त्याशिवाय राष्ट्रीय बँकामधून हे कर्ज दिले जाते. स्थापनेनंतर सहा महिन्यांत कर्जास ते पात्र ठरतात. त्या कर्जात त्यांना व्याजासाठी सरकारकडून सवलत दिली जाते, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण…
जिल्ह्यात या वर्षीच्या एप्रिल ते आतापर्यंत अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये पंधराशे बचत गटांची स्थापना झाली. जिल्हा परिषदेने प्रत्येक महिलेला बचत गटांमध्ये सहभागी होण्याची मोहीम मध्यंतरी राबविली होती. त्यामुळे जिल्ह्यात गटांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेतही प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत जिल्ह्यातील बचत गटांना दोनशे कोटीपर्यंतचे कर्ज देता येत होते. आता कर्जाची रक्कमही दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button