पुणे : ज्युनिअर वकील महिलेला ‘मौसम मस्ताना…’ म्हणत विनयभंग; वरिष्ठ वकिलावर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : ज्युनिअर वकील महिलेला ‘मौसम मस्ताना...’ म्हणत विनयभंग; वरिष्ठ वकिलावर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सहकारी ज्युनिअर वकील महिलेला ‘मौसम मस्ताना है…’ म्हणत तिला चुंबन देण्याची मागणी करणार्‍या वरिष्ठ वकिलावर विनयभंग, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर त्याला देखील मारहाण करून तिचे केस पकडून तिलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वाघोलीतील एका 38 वर्षीय ज्युनिअर वकील महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिवाजीनगर न्यायालयात एका वकिलाकडे ज्युनिअर वकील म्हणून काम करतात. त्या 2010 पासून वकिली क्षेत्रात असून, विवाहित आहेत. फिर्यादीकडील काही प्रकरणे आणि त्या वकिलाकडील प्रकरणे दोघेही एकत्र चालवतात. 6 जुलै रोजी त्या आणि तो वकील अहमदनगर न्यायालय येथे एकाच कारमधून जमिनीच्या युक्तिवादासाठी गेले होेते. पुण्याला परत येत असताना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरजवळ वकिलाने पावसाचे वातावरण पाहून फिर्यादींना ‘मौसम मस्ताना है…’ म्हणत त्यांना चुंबन देण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी त्या वकिलाला फटकारले; तसेच ‘तुमच्या मनात अशी घाणेरडी भावना आलीच कशी?’ असा प्रश्न उपस्थित केला.

त्यानंतर त्यांनी पतीसोबत घरी जात असताना त्यांना हा प्रकार सांगितला. त्यावर पतीने त्यांना त्याच्याकडे कामास जाऊ नको, असा सल्ला दिला. मात्र, फाईलच्या निमित्ताने ते फिर्यादींना फोन करीत होते. 26 जुलै रोजी त्या कोर्टात गेल्या असता त्यांनी तिथे फाईलच्या निमित्ताने त्यांचा विनयभंग केला. त्याच दिवशी त्यांचे पती कोर्टात आले असताना त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनाही वकिलाने मारहाण केली. फिर्यादीचे केस धरून त्यांनाही हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button