पिंपरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर होणार | पुढारी

पिंपरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर होणार

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येणार्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 35 हजार 68 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. 4 हजार 574 विद्यार्थ्यांनी अंतर्गत कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले आहे, अशी माहिती केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना अर्जाचे भाग भरण्यासाठी काही दिवस दिले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

चिंचवडसह राज्यातील अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया रखडली होती. राज्य मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘सीबीएसई’ मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना अकरावीत ‘एसएससी’ मंडळातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना आता अर्जाचे दोन्ही भाग भरण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत आत्तापर्यंत 97 हजार 245 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 75 हजार 650 विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरुन अर्ज ‘लॉक’ केले आहे. तर, 35 हजार 68 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. तर, 4 हजार 574 विद्यार्थ्यांनी अंतर्गत कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले आहे, अशी माहिती शेंडकर यांनी दिली.

Back to top button