पारगाव : बंधार्‍यांचे 91 ढापे चोरट्यांनी पळविले; पाटबंधारे विभागाचे सात लाख रुपयांचे नुकसान | पुढारी

पारगाव : बंधार्‍यांचे 91 ढापे चोरट्यांनी पळविले; पाटबंधारे विभागाचे सात लाख रुपयांचे नुकसान

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यात नदीपात्रातील शेतीपंपाच्या तांब्याच्या तारा, केबलच्या चोर्‍या सुरूच असताना आता बंधार्‍यांचे लोखंडी ढापे चोरट्यांनी लंपास केले आहेत. वळती-नागापूर गावांदरम्यान असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे 91 ढापे चोरट्यांनी चोरून नेले. यामुळे पाटबंधारे विभागाचे जवळपास 7 लाख रुपयांचे नुकसान झाले. चार-पाच दिवसांपूर्वी पिंपळगाव खडकी येथून घोड नदीवरील बंधार्‍याच्या ढाप्यांची चोरी झाली होती.

त्यानंतर वळती-नागापूर गावांदरम्यान मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे जवळपास 91 ढापे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 21) घडली. एका लोखंडी ढाप्याची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे. 91 ढापे चोरट्यांनी लंपास केल्याने पाटबंधारे विभागाचे जवळपास 7 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वळती-नागापूर गावांदरम्यान असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या लोखंडी ढाप्यांची एकूण संख्या 175 आहे. त्यातील 91 ढाप्यांची चोरी झाली आहे. मीना नदीपात्रातील शेतकर्‍यांच्या शेतीपंपाच्या केबल, तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

यामध्ये लाखो रुपयांचे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. आता मीना नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या ढाप्यांची चोरी होऊ लागल्याने पाटबंधारे विभागाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, नागापूर गावच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यामधील ढाप्यांची चोरीची घटना घडल्यानंतर कालवा सल्लागार समितीचे सदस्य व मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक शेतकर्‍यांशी चर्चा केली.

Back to top button