पुणे : आठवड्यात 28 हजार जणांना बूस्टर डोस | पुढारी

पुणे : आठवड्यात 28 हजार जणांना बूस्टर डोस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात 15 जुलैपासून महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वयोगटांतील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एका आठवड्यात शहरात 28 हजार नागरिकांनी मोफत बूस्टरचा लाभ घेतला आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी केंद्रांमध्ये लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण करून घेणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. मोफत लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अनेकांना याबाबत माहिती मिळाली नसल्याने प्रतिसाद काहीसा संथ होता. मात्र, दुसर्‍या दिवसापासून लाभार्थींची संख्या वाढू लागली. 16 जुलैला 6000 हून अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेतले.

सध्या दर दिवशी 4000 ते 5000 नागरिक लसीकरणाचा लाभ घेत आहेत. शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येणे शक्य आहे.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. मोफत लसीकरण सुविधा 75 दिवस सुरू राहणार आहे.

18 ते 59 वयोगटाचे लसीकरण
दिनांक लाभार्थी
15 जुलै 2828
16 जुलै 6340
17 जुलै निरंक
18 जुलै 5186
19 जुलै 4817
20 जुलै 4310
21 जुलै 4615

 

Back to top button