पुणे : पोलिस आयुक्तांच्या पत्नीकडून पाककलेचे धडे | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्तांच्या पत्नीकडून पाककलेचे धडे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कुटुंबीयांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्नी जुगनू गुप्ता यांनी पाककलेचे धडे दिले. या वेळी अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यादेखील उपस्थित होत्या. पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी 20 ते 21 जुलै या कालावधीत दोन दिवसीय पाककलेच्या प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मुख्यालयात करण्यात आले होते.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कुटुंबातील महिलांसाठी पाककलेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस वसाहतीतील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. दररोजच्या आहारासह वेगवेगळे चविष्ट पदार्थ कसे बनवावेत, याचे प्रात्यिक्षिक दाखविण्यात आले. पोलिस कुटुंबातील महिलांना अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात रुचकर पदार्थ कसे बनवावेत, या विषयीचे मार्गदर्शन जुगनू गुप्ता यांनी केले. या वेळी उपस्थित महिला अमलदारांसह पोलिस कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. प्रशिक्षणामधून नावीन्यपूर्ण पदार्थ शिकायला मिळाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला.

Back to top button