मंचर : संततधारेने अवसरी बुद्रुक येथील बंधारा तुडुंब | पुढारी

मंचर : संततधारेने अवसरी बुद्रुक येथील बंधारा तुडुंब

मंचर, पुढारी वृत्तसेवा: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालच्या शिवारमधील तेलाचा आंबा सिमेंट काँक्रीट बंधारा नुकताच बांधून पूर्ण झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने हा बंधारा तुडुंब भरून वाहू लागला आहे. अवसरी बुद्रुक परिसरात तेलाचा आंबा काँक्रीट बंधारा तत्कालीन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या निधीमधून मंजूर करण्यात आला होता. 15 लाख रुपये निधी खर्च करून नुकतेच या बंधार्‍याचे काम पूर्ण झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने बंधारा पूर्ण भरला आहे.

या बंधार्‍याच्या कामासाठी सुभाष विविध कार्य सोसायटीचे माजी अध्यक्ष शामराव हिंगे पाटील, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले होते. पुणे जिल्हा परिषद पुणे लघू पाटबंधारे विभागामार्फत शाखा अभियंता डी. डी. चव्हाण यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले आहे. तेलाचा काँक्रीट बंधारा तुडुंब भरल्याने हजारो लिटर पाणीसाठा झाला आहे. परिसरातील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने शेतपिकांना या पाण्याचा वापर करता येणार आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली येणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

Back to top button