मावळात बुडालेल्या मुलीचा मृतदेह मिळाला खेड तालुक्यात | पुढारी

मावळात बुडालेल्या मुलीचा मृतदेह मिळाला खेड तालुक्यात

चाकण, पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळ्यावर बुधवारी (दि. 6 जुलै) मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला आलेली साक्षी सतीश वंजारे (वय 20, रा. आकुर्डी, थर्मेक्स चौक) पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात पडून प्रवाहाबरोबर वाहत गेली. तिचा मृतदेह कुंडमळ्यापासून सुमारे 4 किलोमीटरवर खेड तालुक्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 20) सायंकाळी कान्हेवाडीतर्फे चाकण (ता. खेड) हद्दीत सापडला.  साक्षी नदीपात्रात पडल्यानंतर तळेगाव “एमआयडीसी” पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग लोणावळा या पथकांच्या साह्याने 4-5 दिवस शोध घेतला, परंतु मुसळधार पाऊस व नदीला पूर आल्याने पाण्याचा वेग वाढल्याने शोधकार्य थांबवले होते.

अखेर पुराचे पाणी कमी झाल्याने झाडाच्या मुळांमध्ये अडकलेला मृतदेह मासेमारी करणार्‍यांना दिसला. त्यानुसार महाळुंगे इंगळे (ता. खेड) पोलिसांना खबर दिली. त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या दुरवस्थेमुळे शवविच्छेदन जाग्यावरच करून रात्री उशिरा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Back to top button