पिंपरी : शहरातील फेरीवाल्यांचे आठ वर्षांनंतर होणार सर्वेक्षण | पुढारी

पिंपरी : शहरातील फेरीवाल्यांचे आठ वर्षांनंतर होणार सर्वेक्षण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील पथ विक्रेते, हातगाडी व फेरीवाला विक्रेत्यांचे अपूर्ण राहिलेले सर्वेक्षण महापालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाने तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतले आहे. संबंधित विक्रेत्यांनी 25 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 या वेळेत आवश्यक कागदपत्रे व आधारकार्ड पुराव्यासह उपस्थित राहून बायोमेट्रिक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि.21) केले आहे.

‘फेरीवाला सर्वेक्षणास महापालिकेकडून टाळाटाळ’ असे वृत्त ‘पुढारी’ने सोमवारी (दि.18) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्वेक्षण करून फेरीवाले व विक्रेत्यांची संपूर्ण माहिती अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. पालिकेने सन 2014 ला फेरीवाल्याचे सर्वेक्षण केले होते. पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

या सर्वेक्षणात 9 हजार 25 फेरीवाल्यांनी नोंद झाली. त्यातील 5 हजार विक्रेत्यांचे बायोमेट्रिक नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आली. उर्वरित 4 हजार विक्रेत्यांची नोंदणी शिल्लक आहे.

Back to top button