नसरापूरमध्ये 80 लाखांचा गंडा; दोघे अटकेत | पुढारी

नसरापूरमध्ये 80 लाखांचा गंडा; दोघे अटकेत

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा: नसरापुरात अवैध सावकारी करत अनेकांना गंडा घालणार्‍या बाप-लेकाला राजगड पोलिसांनी अटक केली. दोघे अनेकांचे सोने गोळा करून जवळपास 70 ते 80 लाखांचा गंडा घालून फरार झाले होते. मात्र, राजगड पोलिसांनी त्यांना राजस्थानमध्ये जाऊन शिताफीने अटक केल्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. बाबूसिंग केशरसिंग चौहान (वय 57 ) शैलेंद्र ऊर्फ शैलेश बाबूसिंग चौहान (वय 22, दोघेही रा. तवाव, ता. जसवंतपूर, जि. जालोर, राजस्थान असे फसवणूक करणार्‍या बाप-लेकांची नावे आहेत.

त्यांनी नसरापूर (ता. भोर) येथे बनेश्वर ज्वेलर्स नावाने सोन्याचांदीचा व्यापार करत असताना नसरापूर, माळेगाव, कामथडी, शिवरे, वेळू निधान-सांगवी, केळवडे, करंजावणे आदी गावातील नागरिकांची सोने बनवून देतो, असे सांगून तसेच पैशाच्या बदल्यात गहाण ठेवलेले सोने लंपास करून आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर तिघेजण फरार झाले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्योती दीपक शिंदे रा. वेळू (ता. भोर) यांच्यासह सोळा जणांच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी दि. 25 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे, पोलिस हवालदार महेश खरात, पो. नाईक गणेश लडकत, शरद धेंडे या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन तपास करून बाबूसिंग व शैलेंद्र यांना राहत्या घरातून पकडले.

आरोपींना ताब्यात घेत असताना तेथील नातेवाईक व महिलांनी पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेथून दोघांना पकडून ताब्यात घेतले, असे उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी सांगितले. मात्र, मंगेश बाबूसिंग चौहान (वय 25) हा फरार आहे. ज्वेलर्सकडून अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

Back to top button