पुणे : ‘नदी सुधार’साठी लवकरच निविदा | पुढारी

पुणे : ‘नदी सुधार’साठी लवकरच निविदा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेतील बाणेर-बालेवाडी-औंध भागातील कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. यातील सुमारे आठ किलोमीटरचा भाग पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. कामांचा निम्मा खर्च द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेच्या वतीने मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना राबविण्यात येत आहे. 11 टप्प्यांमध्ये सुमारे 44 किलोमीटरच्या नदीकाठचे सुशोभीकरण व अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

योजनेतील दोन टप्प्यांच्या कामाला यापुर्वीच सुरूवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजनही झाले आहे. या योजनेला गती देण्यासाठी बाणेर, बालेवाडी आणि औंध या टप्प्याची 610 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. मुळा नदी ही पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या सीमेवरून वाहते.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील बाणेर, बालेवाडी, औंध हा भाग या नदीच्या काठावर आहे. पुणे महापालिकेने मुळा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांच्या सुधारासाठी आराखडा तयार केला आहे. याचा खर्च सुमारे सहाशे दहा कोटी रुपये इतका असुन, यातील निम्मा खर्च हा पिंपरी चिंचवड महापालिकेने करावा, अशी मागणी पुणे महापालिकेने केली आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकांशी चर्चा सुरू असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

इतरही निविदा काढणार
खडकी स्टेशन येथील जुना पुणे-मुंबई महामार्ग हा चौपदरी केला जाणार आहे. या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तसेच देवाची उरुळी येथील कचरा डेपोतील शिल्लक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सुस-म्हाळुंगे-बावधन येथील पाणी प्रकल्पाच्या कामासाठीदेखील लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सर्व सूचनांवर काम सुरू
मुळा- मुठा नदी सुधार योजनेसंदर्भात सिंचन विभाग आणि पर्यावरणप्रेमींनी काही आक्षेप आणि सूचना केल्या आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासन काम करीत आहे. त्यांना लेखी उत्तरही दिले गेले आहे. या नदीच्या पाणी वहन क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही. नदीतील पाणी स्वच्छ राहण्यासाठी प्रक्रिया करूनच नदीत पाणी सोडले जाणार आहे.

                                                           -विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Back to top button