पुणे : ठेका एकाला, वसुली दुसर्‍याकडून! मार्केट यार्डातील प्रकार | पुढारी

पुणे : ठेका एकाला, वसुली दुसर्‍याकडून! मार्केट यार्डातील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे बाजार समितीच्या पार्किंगचा ठेका जय जवान सिक्युरिटी एजन्सीला दिला असताना, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड टेम्पो पंचायतच्या नावाने पार्किंग शुल्क वसूल करण्यात येत आहे. रस्त्यात अडवून अरेरावी करीत शुल्क वसूल केली जात असल्याचे समोर आले आहे.  गुलटेकडी मार्केट यार्डाच्या चार नंबरच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत दुचाकी, तीनचाकी, चारचाकीसाठी वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे.

जनावरांचा बाजार आणि बटाटा शेडलगत असलेल्या या मोकळ्या जागेवर पार्किंगसाठी जय जवान सिक्युरिटी एजन्सी यांना तीन वर्षांसाठी ठेका देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड टेम्पो पंचायतकडून त्यांच्या नावाच्या पावत्या देऊन वसुली सुरू आहे.

केळीबाजारापासून बिबवेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यांच्या कडेला बाजारात शेतमाल खरेदीसाठी येणारे सर्वसामान्य ग्राहक, खरेदीदार आणि आडते येथे दुचाकी लावतात. आत्तापर्यंत या जागांवर लावलेल्या वाहनांकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात नव्हते. याउलट सिंगल पार्किंगचे बोर्ड लावून तेथे वाहने लावण्याची परवानगी दिली होती.

मात्र, या ठेकेदाराच्या कामगारांनी सर्व ठिकाणी नियबाह्य पध्दतीने वसुली सुरू केली आहे. नियमबाह्य पध्दतीने केळीबाजारात वसुलीबाबत संबंधित विभागाने ही बाब बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, समितीने त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप बाजारघटकांकडून करण्यात येत आहे.

संबंधितांना सूचना केल्या : गरड
जय जवान सिक्युरिटी एजन्सीमार्फत पूर्वी ठेका दिलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड टेम्पो पंचायत पावत्या वापरून शुल्क वसूल करण्याचे काम सुरू होते. याबाबत त्यांना ताकीद दिली असून, पार्किंग शुल्क पावती ही एजन्सीच्याच नावे असावी, अशा सूचना केल्या आहेत, अशी सारवासारव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केली.

Back to top button