पुणे : भिगवण स्टेशनमधील डस्ट वाहतुकीला आळा | पुढारी

पुणे : भिगवण स्टेशनमधील डस्ट वाहतुकीला आळा

भिगवण, पुढारी वृत्तसेवा : शेती, जनावरे व मानवी आरोग्याला धोकादायक असलेल्या भिगवण स्टेशन येथील डस्ट (विषारी राख) वाहतुकीचा वाद सलग तीन दिवस धुमसत होता. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केल्यावर दाखल घेत सोमवारी (दि. 18) रेल्वे व प्रशासनाला या डस्ट वाहतुकीचा गाशा गुंडाळावा लागला.

शनिवारी (दि. 16) व रविवारी (दि. 17) दिवसभर डस्ट वाहतुकीचा वाद कमालीचा विकोपाला गेला. वाहतूकदार व ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ग्रामसभेने ठराव घेऊनही डस्ट वाहतुकीचा घाट बांधला जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला तसेच वाहतूकही रोखून धरली. उग्र आंदोलनातून तणाव निर्माण झाला.

सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिले. या प्रसंगी सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच शीतल शिंदे, पराग जाधव, संजय देहाडे, जावेद शेख, दत्ता धवडे, सत्यवान भोसले आदींसह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेच्या ठरावाला मुठमाती देण्याची व्यवस्था सर्वच शासकीय यंत्रणांनी राबविल्याचा आरोप आंदोलकांनी करीत उपोषणावर ठाम राहिले. अखेर याची दखल घेत सोमवारी रेल्वे प्रशासनाला डस्ट वाहतुकीचा गाशा गुंडाळावा लागला.

ठेकेदारांकडून आंदोलकांवर प्रत्यारोप

दुसरीकडे, डस्ट वाहतुकीची बाजू घेणारे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते यांनी तीव— नाराजी व्यक्त केली आहे. डस्ट वाहतूक सर्व नियम पाळून केली जात होती. केवळ राजकीय द्वेषापोटी अडवणूक केली गेली. कित्येक वर्षांपासून डस्ट वाहतूक होत होती, तेव्हा विरोध नाही झाला आणि आता आम्ही ठेका घेतला तेव्हा त्रास कसा होऊ लागला? डस्टपेक्षा घातक पदार्थांची वाहतूक सर्वत्र केली जाते. त्याला विरोध होतो का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Back to top button