महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात पिके सडू लागली; संततधार पावसामुळे शेतकरी चिंतीत | पुढारी

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात पिके सडू लागली; संततधार पावसामुळे शेतकरी चिंतीत

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागात दहा दिवसांपासून होणा-या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे भुईमूग व पालेभाज्यावर्गीय पिके सडू लागली आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक भागात सात दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही.

पिकांमध्ये पाणी साचल्याने पालक, कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, मेथी आदी पिके सडू लागली आहेत. ढगाळ वातावरण, पावसामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. रोगांचा सर्वाधिक फटका लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ आदी गावांतील भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचून ते पिवळे पडू लागले आहे.

उन्हाळी भुईमूगाची काढणी खोळंबली
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे उन्हाळी भुईमूगाची काढणी रखडली आहे. भुईमूगाचे नुकसान होऊन शेंगांना जमिनीतच मोड येण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे, असे साकोरे येथील शेतकरी सदाशिव गाडे यांनी सांगितले.

 

Back to top button