तळेगाव दाभाडे : ‘फेरीवाल्यांना कर्ज पुरवठ्यासाठी नगर परिषद शिफारस करणार’ | पुढारी

तळेगाव दाभाडे : ‘फेरीवाल्यांना कर्ज पुरवठ्यासाठी नगर परिषद शिफारस करणार’

तळेगाव दाभाडे : शहरातील रस्त्यावर फिरून व्यवसाय करणारे, फेरीवाले, पथविक्रेते यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेअंतर्गत दहा हजार रुपये पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना नगर परिषद शिफारस करणार आहे. यासाठी नगर परिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले आहे.

केंद्र शासनाकडून फेरीवाल्यांना/पथविक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली आहे. पथविक्रेत्यांना 10 हजारांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. तळेगाव दाभाडे शहरात ही योजना राबविली जात असून आतापर्यंत 428 पथविक्रेत्यांना दहा हजार कर्ज देण्यात आले आहे. तसेच, 20 हजार 45 पथविक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

सध्या रस्त्यावर फिरून व्यवसाय करणारे व्यावसायिक प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पथ विक्रेता सूक्ष्म अर्थसहाय) योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून लोकांना स्वावलंबी व सशक्त बनविणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. या आधारे कोविड-19 काळात बंद पडलेला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध होईल. या योजने अंतर्गत खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्याची स्वनिधी योजना सुरू केली आहे.

यामध्ये 10 हजार रुपयांच्या पहिल्या कर्जाची नियमित परत फेड केल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पथविक्रेत्यांना नव्याने 20 हजारांपर्यंतचे कर्ज मिळत आहे. तसेच, 20 हजार नियमित परत फेड केल्यास 50 हजार अशा स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ मिळ्णार आहे. यासाठी आधारकार्ड, आधारला लिंक मोबाईल नंबर, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, व्यवसाय करत असलेल्याचा फोटो आवश्यक आहे.

Back to top button